पाचगणी : भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात पंचायच समिती व जिल्हा परिषदेसाठी झालेल्या आरक्षणानुसार महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील गणाच्या आरक्षणात मेटगुताड गणाला नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे मेटगुताड गणातून निवडून येणारा प्रतिनीधीच महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापतिपदी विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गण व कुंभरोशी गण सर्वसाधारण खुल्या गटाकरीता आरक्षित झाल्यामुळे दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तळदेव गण व कुंभरोशी गणावर स्थानिक आमदार मकरंद पाटील यांची पकड मजबुत आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून देखील या गणात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. तर भिलार गणात सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे दिगज्ज नेत्याचा हिरमोड झाला आहे. भिलार गण कै. बाळासाहेब भिलारे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भिलार गणातून कै. बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबातून महिला राजकीय रणागंणात प्रवेश करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी सभापती रुपाली राजपुरे देखील पुन्हा नशीब आजमवणार का याबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवत जिल्हा बॅकेचे संचालक राजुशेठ राजपुरे सावध राजकारण करत असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक प्रवीण भिलारे यांच्या पत्नी व भिलारच्या माजी सरपंच वंदना भिलारे यादेखील भिलार गणातून आपलं नशीब आजमवाणार असल्याची चर्चा आहे. काही नवीन चेहरे देखील समोर येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तळदेवमधून प्रतिष्ठा पणाला लागणार महाबळेश्वर तालुक्यातून जिल्हा परिषदेकरीता मातब्बरांकडून जोरदार मोर्चेबांधणी होत असताना तळदेव गण सर्वसाधारण खुल्या गटाकरीता व भिलार गट अनुसूचित जाती जमातीकरीता आरक्षित झाला आहे. तालुक्यातील मातब्बर तळदेव गटातून आपले नशीब आजमवणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष मानली जात आहे. मंत्री मंकरंद पाटील यांचे कट्टर समर्थक राजूशेठ राजपुरे व संजय गायकवाड हे तळदेव गटावर आपला हक्क सांगत आहेत. तालुक्यात दोन दिग्गज्ज तळदेव गटातून आपलं नशीब आजमवणार का, याबाबत तालुक्यात चर्चा सुरु असताना दोन्ही नेत्यांनी समोरासमोर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रवीण भिलारे देखील या रिंगणात असतील का, याचीही चर्चा होत आहे. तळदेव गटाच्या खुल्या आरक्षणामुळे मंत्री मकरंद पाटील यांची डोकेदुखी वाढणार असून तालुक्यात मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागणार हे मात्र नक्की.