Wagholi News : मीटर फास्ट, महावितरणचे अधिकारी स्लो; सोलर सिस्टिम धारकाला वीज बिलांचा दणका

वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील घरगुती वापरासाठी सहा केव्ही ची गरज असताना दहा केव्ही थ्री फेज कनेक्शन घेऊन सोलर सिस्टिम बसवण्यात आलेल्या वीज ग्राहकाला सहा वर्षे त्रास न आलेले वीज भाडे आता येत असल्याने मीटर फास्ट बाबत पडताळणी करण्याची विनंती करून देखील महावितरणचे अधिकारी यांच्याकडून सुरू असलेल्या वेळ काढूपणामुळे वीज ग्राहकाला वीज बिलांचा दणका बसू लागला असून आर्थिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
वाघोली तालुका हवेली येथील राजेंद्र अमृतराव सातव यांनी घरगुती वापरासाठी दहा केव्ही थ्री फेज कनेक्शन घेतले आहे. यासाठी सोलर सिस्टिम बसवण्यात आली आहे. सोलर सिस्टिम मधून वापरलेले वीज बिल हे अनेक वेळा वजावटीत रुपात आले आहे. काही वेळा ते 400 ते 500 रुपयांच्या भाड्याच्या रूपाने आले आहे. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हजारोंच्या पटीत विज बिल येत असल्याने वाघोलीच्या सहाय्यक अभियंता बाबर यांच्याकडे याबाबतीत 20 जानेवारी 2025 रोजी मीटर फास्ट असलेल्या संशयावरून मीटर टेस्टिंग करून घेण्याबाबतची लेखी तक्रार सातव यांनी सहाय्यक अभियंता वाघोली यांच्याकडे केली होती.
यासाठीचे टेस्टिंग अनामत रक्कम देखील त्यांनी भरली आहे. २० जानेवारी रोजी पैसे भरून देखील महावितरण कडून त्यांचा वीज मीटर काढून घेऊन त्याची टेस्टिंग न केल्यामुळे नाहक मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या शाखा अभियंता. यांनी याबाबतीत त्यांनी प्रत्यक्ष सोलर सिस्टिम व इतर उपकरणांची सद्यस्थितीबाबतचा भेटीत आढावा देखील घेतला आहे. तरी देखील महावितरण कडून वाढीव बिलांचा प्रकार सुरू आहे. सोलर सिस्टीम धारकाला आलेल्या अनुभवामुळे वाघोलीत मीटर फास्ट असल्याची तक्रार करून देखील अधिकारी स्लो असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मीटर टेस्टिंग साठी सोमवारी पाठवण्यात येणार आहे. असे शाखा अभियंता बाबर यांनी सांगितले आहे.
मीटर फास्ट अथवा मीटरची पडताळणी करण्याबाबत शाखा अभियंता बाबर यांना प्रत्यक्ष सोलर सिस्टिम दाखवून माहिती दिली आहे. मीटर टेस्टिंगसाठी नेण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करून बिलांमध्ये वाढ करण्याचा प्रकार सुरू आहे.याबाबतीत कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांच्याशी देखील संपर्क साधला आहे. महावितरण कडून या प्रकरणाची दखल घ्यावी.
राजेंद्र सातव पाटील
माजी उपसरपंच, वाघोली




