हवामान खात्याने जाहीर केला पुढील तीन दिवसांचा अंदाज; राज्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पुणे – राज्यात वातावरण सातत्याने बदलत आहे. काही ठिकाणी उन्हाचा चटका त्रास देत असताना, काही भागांत ढगाळ हवामान आणि पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. या अस्थिर वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन दिवसांचा अंदाज जाहीर केला असून, राज्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोणत्या भागात पाऊस?
हवामान विभागानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, असेही सांगण्यात आले आहे.
Climate Research & Services, IMD Pune@ClimateImd pic.twitter.com/VOXyrSAvOS
— Climate Research & Services, IMD Pune (@ClimateImd) April 4, 2025
शहापूरमध्ये गारपीट
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर सुरू झालेल्या या पावसात गारपीटही झाली, ज्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा जाणवला. मुलांना गारा गोळा करताना मजा येत असल्याचे दृश्य दिसले.
मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली
वादळी वाऱ्याचा मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. आटगाव आणि थानशेत दरम्यान ओव्हरहेड वायरवर वाऱ्याने उडालेले पत्रे अडकल्याने वाहतूक अडकली. कसारा ते कल्याण मार्गावरील एक लोकल १५ मिनिटे, तर एक एक्स्प्रेस ८ मिनिटे थांबली. १५ ते २० मिनिटांत वाहतूक सुरळीत झाली.
भिवंडीतही पावसाची दमदार एन्ट्री
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. धुळीच्या लोटासह आलेल्या वाऱ्याने नागरिकांची धावपळ उडाली. सकाळपासून वाढलेला उकाडा कमी होऊन गारवा जाणवला, पण काही ठिकाणी पत्रे कोसळली आणि झाडांच्या फांद्या तुटल्या. शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.





