‘बीड’मध्ये प्रीतम मुंडेंना ‘चेकमेट’ करण्यासाठी मेटेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा  

मुंबई : शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे हे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास मदत करणार असल्याचे वृत्त आहे.

याबाबत, एका वृत्तसंस्थेशी बोलताना मेटे यांनी सांगितले की, “गेल्या पाच वर्षांमध्ये येथील भाजप खासदाराने आमच्या कार्यकर्त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली आहे. मला याबाबत माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपण हे सहन करावे का? असं विचारलं असता मी त्यांना आपण हे सहन करण्याचे काही एक कारण नसून तुम्हीच योग्य तो निर्णय घ्या असं सांगितलं.”

दरम्यान, विनायक मेटेंच्या एका निकटवर्तीयाने याबाबत खुलासा करताना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मेटे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना प्रीतम मुंडे यांच्याविरोधात मदत करणार असल्याचे सांगितले. मात्र मेटे इतर मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांनाच पाठिंबा देतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

मुळचे बीड जिल्ह्यातील असणाऱ्या मेटे यांनी अनेक वेळा बीडच्या खासदार प्रीतम मुंडे तथा त्यांच्या भगिनी व महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जाहीर टीका केली आहे. मेटे यांच्या पाठिंब्याने आता बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास बळकटी मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.