“मेटा’ कंपनीकडून पुन्हा एकदा 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ; मार्क झुकरबर्ग म्हणाला – ‘दुसरा मार्ग नाही’

दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट पसरले होते. या संपूर्ण काळामध्ये आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरभराट झाली होती. परंतु आता जगभरातील नामांकीत टेक कंपन्यांचे गेल्या वर्षाच्या अखेरीपासून ते आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे सत्र अजूनही सुरूच ठेवले आहे.
फेसबुकची मूळ कंपनी मेटा नोव्हेंबरमध्ये तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिलं होतं. हीच मेटा कंपनी आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा विचार करत आहे. याचा परिणाम फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्रामच्या इतर सर्व कर्मचाऱ्यांवर होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला असून कंपनीने बुधवारी आपल्या व्यवस्थापकांना या बद्दलची घोषणा करण्यास सांगितले आहे. या वेळी 10,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी मेटाने केली आहे. यासंदर्भातील संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मार्च महिन्यातच दिले होते. आता त्याची अमंलबजावणी पुढील मे महिन्यात केली जाणार आहे.
मार्क झुकरबर्ग म्हणाला, दुसरा मार्ग नाही-
हा अतिशय वाईट निर्णय आहे, परंतु त्याला दुसरा कोणताही मार्ग नाही. कंपनीने मेटाव्हर्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ऑनलाइन जाहिरात बाजारातील मंदी आणि टिकटॉक सारख्या प्रतिस्पर्ध्यांकडून झालेल्या स्पर्धेमुळे चौथ्या तिमाहीत कमी नफा आणि महसूल नोंदवला गेला. त्यामुळे कंपनीचे अधिक नुकसान होत आहे. म्हणून हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग म्हटले आहे.





