मनोरुग्ण बलात्कार पिडीतेचे रुग्णालयात निधन

बरेली – मूळात मानसिक विकलांग असलेल्या येथील एका 15 वर्षांच्या मुलीला दिवस गेल्याचे समजल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले होते. या बलात्कारामुळे 7 महिन्याची गर्भवती असलेल्या या पिडीतेचे उत्तर प्रदेशातील बरेली जिल्हा रुग्णालयात निधन झाले. या घटनेमुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात “पोक्सो’ कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सदर पिडीता गर्भवती असल्याने आणि बहुधा ती गर्भवती असल्याचे तिच्या लक्षातच न आल्याने झालेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे तिच्यावर उपचार सुरू होते. तिला शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री तिचे निधन झाले, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.
अत्यंत गंभीर प्रकृती असताना या मुलीला रुग्णालयात आणले गेले होते. त्यानंतर तिची प्रकृती अधिकाधिक ढासळत गेली. डॉक्टरांनी या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही, असे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. जंतू संसर्गामुळे या मुलीचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन तपासणीमध्ये आढळले आहे. मात्र, शवविच्छेदन तपासणीचा अहवाल राखून ठेवण्यात आला आहे, असे बरेलीच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये लॉकडाऊनच्या काळात तिच्यावर बलात्कार झाला होत. या प्रकाराबद्दल कोणाकडे तक्रार केल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली होती. डिसेंबर महिन्यात ही मुलगी 6 महिन्यांची गर्भवती राहिल्याचे उघड झाल्यावर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.





