डॉ. अंजली कुरणे ः अनंतराव पवार महाविद्यालयात कार्यशाळा
पिरंगुट- समाजामधील महिलांच्या समस्या या फक्त महिलांपुढे न मांडता पुरुषांसमोरही मांडायला हव्यात. महिला सबलीकरणामध्ये पुरुषांचाही तेवढाच वाटा असायला हवा. महिलांचे सबलीकरण मानसिक, सामाजिक, शारीरिकदृष्ट्या व्हायला हवे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांनी व्यक्त केले.
येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “महिला सबलीकरण’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. कुरणे बोलत होत्या.
यावेळी उपप्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, डॉ. प्रवीण चोळके, पत्रकार शर्मिला पवार, कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक ससाणे, डॉ. संध्या खंडागळे, प्रा. मेघा पाटोळे, प्रा, विजय रणदिवे, वसुधा नंदनवार, प्रा. वैभवी काळे आदी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शर्मिला पवार म्हणाल्या, विद्यार्थिनींनी स्वत:बरोबरच घरातील स्त्रियांचे आरोग्यही जपले पाहिजे. अधुनिक काळात महिला सबलीकरणाची व्याख्या बदलली आहे. आपल्या हक्कांची आणि अधिकारांची जाणीव प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवी. सूत्रसंचालन प्रा. मिनाली चव्हाण यांनी केले. डॉ. संगीता भालेराव यांनी आभार मानले.