मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीचं राजकारणात पदार्पण; ‘या’ ठिकाणाहून लढवणार निवडणूक

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार आहेत. राज्यातील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून पीडीपीने आघाडी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये त्यांनी मुलगी इल्तिजा मुफ्ती यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
‘या’ ठिकाणाहून लढवणार निवडणूक
इल्तिजा मुफ्ती या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवणार आहे. इल्तिजाला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बिजबेहारा येथून निवडणूक लढणार आहे. इल्तिजा मुफ्ती बिजबेहरा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
‘या’ उमेदवारांना केले तिकीट जाहीर
अनंतनाग पूर्वमधून ज्येष्ठ नेते अब्दुल रेहमान वीरी आणि देवसरमधून मुफ्ती यांचे काका सरताज अहमद मदनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अनंतनागमधून माजी खासदार मेहबूब बेग, चरार-ए-शरीफमधून गुलाम नबी लोन हंजुरा आणि वॉचीमधून गुलाम मोहिउद्दीन वानी निवडणूक लढवणार आहेत.
श्रीनगर मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे आगा सय्यद रुहुल्लामेहदी यांच्याकडून पराभूत झालेले पक्षाचे युवा नेते वहीद पारा यांना अनंतनागमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने त्रालमधून रफिक अहमद नाईक यांना उमेदवारी दिली आहे.
‘या’ दिवशी पार पडणार निवडणुका
जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.





