‘पीडीपी’ पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांचा ‘इंडिया’ आघाडीला पाठिंबा

राजौरी/जम्मू, – जम्मू आणि काश्मीरमधील तीन लोकसभा जागांवर नॅशनल कॉन्फरन्सच्या विरोधात स्वतंत्र निवडणूक लढवणाऱ्या पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी आम्ही वैचारीक आधारावर इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.
आम्हाला देशाची घटना वाचवणे महत्वाचे वाटते आहे असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. राहुल गांधी हे एकमेव असे नेते आहेत जे संविधानाच्या रक्षणासाठी मजबुतीने लढा देत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
सुरूवातीला पीडिपी पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष होता. पण त्या राज्यातील सहा मतदार संघांच्या जागा वाटपात पीडिपी पक्षाला एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यांची काश्मीरात नॅशनल कॉन्फरन्सशी लढाई आहे. पण मेहबुबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यातील तीन मतदार संघ वगळता अन्यत्र कॉंग्रेसलाच पाठिंबा जाहीर केला आहे.
२५ मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होत असलेल्या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून मेहबूबा स्वत: रिंगणात आहेत. त्यांना एनसीचे माजी मंत्री आणि प्रभावी गुज्जर नेते मियां अल्ताफ आणि अपनी पार्टीचे जफर इक्बाल यांच्याकडून कडवी लढत मिळण्याची शक्यता आहे.





