Police Bharti Maharashtra 2025 : महाराष्ट्रातील लाखो तरुणांची पोलीस भरतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. १२ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल १४,००० पोलीस पदांच्या भरतीला मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता लवकरच वेग घेईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. ही बातमी पोलीस दलात सामील होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची आहे. महायुती सरकारचा निर्णय महायुती सरकारने या भरतीला मंजुरी देऊन राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात ३८,८०२ पोलीस पदांची भरती पूर्ण झाली असून, आता या १४,००० पदांमुळे पोलीस दलाला नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी १८ जुलै २०२५ रोजी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १३,५६० पदांची भरती जाहीर केली होती, आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही संख्या १४,००० पर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. यापूर्वी एप्रिल २०२४ मध्ये १७,४७१ जागांसाठी १७ लाखांहून अधिक अर्ज आले होते, ज्यामुळे या भरतीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद स्पष्ट होतो. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर उमेदवारांना पुन्हा एकदा तयारीला लागण्याची संधी आहे. अधिकृत जाहिरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर २०२५ च्या सुरुवातीला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.