पुणे | पाणी योजनांना गती देण्यासाठी बैठक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गावांची भौगोलिक स्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन पुढील ५० वर्षे गावांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणीयोजनांचा परिपूर्ण प्रस्ताव अंदाजपत्रकासह राज्य शासनाकडे पाठवावा.
प्रस्ताव येताच त्याला तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निविदाप्रक्रिया राबवून या योजनांचा काम तातडीने मार्गी लावण्यात येईल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही तातडीने करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी, इंदापूर तालुक्यातील बोरी या पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
नवीन प्रस्ताव तयार करताना धरणातून बंद पाइपद्वारे पाणी आणणे किंवा नवीन साठवण तलाव बांधणे यासारख्या पर्यायांचाही विचार करावा.
या गावातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना स्वत: भेट द्यावी, अशी सूचनाही पवार यांनी केली.
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे नव्या, पक्क्या साठवण तलावास मंजूरी
बारामती तालुक्यातील मौजे कांबळेश्वर येथील मातीच्या साठवण तलावातून कांबळेश्वर-शिरवली-शिरष्णे-लाटे-माळेवाडी या पाच गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या साठवण तलावाचे बांधकाम जीर्ण झाले असल्याने मोठ्या प्रमाणावर गळती होते.
या साठवण तलावाचे बांधकाम नव्याने आणि पक्क्या स्वरुपात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.





