पुणे | हर्षवर्धन पाटील-शरद पवार यांची भेट

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणुक लढविण्याची तयारी अनेक नेत्यांनी केली आहे.
त्यानुसार गाठीभेटीचे सत्र सुरू झाले आहे. अशातच मंगळवारी मांजरी येथे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधान आले.
वसंत दादा शुगर इन्स्टिट्युट येथील बैठक संपल्यानंतर पवार आणि पाटील यांच्यात बंद दाराआड बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपचे कमळ सोडून राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
त्यातच मंगळवारच्या या भेटीमुळे त्या शक्यतेला बळ मिळाले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली. ते समजु शकले नाही.
इन्स्टिट्यूटच्या बैठकीला शरद पवार यांच्यासह, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, माढ्याचे आमदार बबन शिंदे, राजेश टोपे, अहमदनगरचे विवेक कोल्हे आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, इंदापूर विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. मात्र जेथे ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला तिकीट मिळणार असल्याचे महायुतीचे सूत्र आहे. त्यामुळे आता भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.





