तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘एक गाव एक उमेदवार’ या संकल्पनेतून शुक्रवारी आयोजित केलेली बैठक वादळी ठरली. स्थानिक नेत्यांमधील मतभेद आणि गटबाजीमुळे सभेचा तोल बिघडला व निर्णय न होऊ शकल्याने सभा निष्फळ ठरली. तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झेडपीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. परंतु जिल्हा परिषद प्रभाग रचनेत तळेगाव ढमढेरे गावाचे दोन गटात विभाजन झाले. जिल्हा परिषद गटाचे नाव संपुष्टात आल्याने तळेगावकरांच्या पदरी परत संघर्ष आला. यावेळी मात्र सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व गावकरी यांनी एकत्रित लढा दिला. निषेध सभा, रॅली, ग्रामसभा, आयुक्त, जिल्हाधिकारी, निवडणूक आयोगाकडे निर्णयावर कायदेशीर लढाई देत गट रचना रद्द करीत गटाचे नाव राखण्यात गावाला यश आले. याचाच प्रत्यय घेत एक गाव एक उमेदवार अशी संकल्पना काही गावकऱ्यांनी मांडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चांगलीच रंगली. एक गाव, एक उमेदवार यासाठी गावातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक देखील झाली. आगामी आरक्षण सोडतीवर पुढील दिशा ठरवू, असे ठरल्याचे समजते. परंतु आता पुन्हा महिलाराज आल्याने या निवडणुकीत नव्याने राजकीय डावपेच होण्याची शक्यता आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत महिलांमधून नव्या नेतृत्वाची चुरस पाहायला मिळणार आहे. सर्वच पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र, समाधानकारक निर्णय न झाल्याने अखेर सभा संपुष्टात आली. आता रविवार (दि.२) नोव्हेंबर रोजी पुन्हा सभा आयोजित करण्यात येणार आहे. सर्व गटांनी एकमताने उमेदवार ठरविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावात राजकीय चर्चा चांगलीच रंगली असून आगामी सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेत्यांच्या गावात एकजूट होणार? तळेगाव ढमढेरे गावात तालुका आणि जिल्हास्तरावर नेत्यांची कर्मभूमी आहे. या गावाला अनेक पदे मिळाली आहे. त्याचा लाभ उठवत अनेकांनी आपली राजकारणातील स्पेस वाढवली आहे. जिल्हा परिषद गट पुनर्रचनेनंतर तळेगाव गटाचे अस्तित्व संपुष्टात आल्याने संपूर्ण गाव या पुनर्रचनेविरोधात एकवटले होते. त्यात यश आले. मात्र, एक गाव, एक उमेदवारीसाठी बैठकीचा सिलसिला सुूरू असल्याने हे चर्चेचे गुऱ्हाळ कधी संपणार, आणि नेत्यांच्या गावात एकजूट होणार काय, याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.