एपिआ, (सामोआ) – भारताच्या मीराबाई चानू हिने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने 49 किलो गटात हे यश मिळविने. ही स्पर्धा पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मालिकांमधील एक स्पर्धा असल्यामुळे तिच्या ऑलिपिक प्रवेशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मीराबाईने स्नॅचमध्ये 84 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 107 किलो असे एकूण 191 किलो वजन उचलले. गतवर्षी तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत 199 किलो वजन उचलले होते मात्र, त्यावेळी तिला पदकापासून वंचित रहावे लागले होते.
भारताच्या झिली दालाबेहरा हिने 45 किलो गटात सोनेरी कामगिरी केली. तिने स्नॅचमध्ये 70 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 94 किलो असे एकूण 164 किलो वजन उचलले. 55 किलो गटात झिली हिची सहकारी सोरोखैबाम बिंद्याराणी हिने सुवर्णपदक मिळविले. तिने स्नॅचमध्ये 78 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 105 किलो असे एकूण 183 किलो वजन उचलले. तिची सहकारी मत्सा संतोषीने रौप्यपदक पटकाविले. तिने 182 किलो वजन उचलले.
पुरुषांच्या 55 किलो गटात ऋषिकांतसिंग याने सुवर्णवेध घेतला. त्याने स्नॅचमध्ये 105 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 130 किलो असे एकूण 235 किलो वजन उचलले.