पुणे – पुणे शहरातील जम्बो हॉस्पिटलमधील रुग्णांवर आयसीएमआरने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उपचार होत आहेत का तसेच करारनाम्यानुसार शैक्षणिक पात्रता असलेले डॉक्टर उपलब्ध आहेत का, याची पाहणी करण्यासाठी आता जम्बो हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिष्ठाता (मेडीकल डीन) नेमण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
मेडिकल शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जम्बो हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राव यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांकडे केली आहे. यास मान्यता मिळाली तर पुणे जिल्ह्यात 600 डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.
विभागीय आयुक्त यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. मेडिकल शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परिक्षा दि. 16 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता देण्यात यावी, असे पत्र वैद्यकीय विभागाला लिहले आहे. याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यास मान्यता मिळेल, असा आशावाद राव यांनी यावेळी व्यक्त केला.
जम्बो हॉस्पिटलमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आधीची एजन्सी अपयशी ठरली. त्यामुळे नव्या दोन एजन्सींना हे काम देण्यात आले आहे. लवकरच जम्बो हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरु करणार असल्याचे राव यांनी सांगितले.