पुणे – महापालिकेच्या प्रस्तावित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज ऍन्ड हॉस्पिटलच्या मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे. या महाविद्यालयास मान्यता देण्याची शिफारस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्य वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाकडे केली आहे. सोबतच 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून त्यासाठीचे प्रवेश देण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. तसा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला आहे.
महापालिकेने डॉ. नायडू सांसर्गिक हॉस्पिटलच्या जागेवर हे महाविद्यालय प्रस्तावित केले आहे. त्यासाठी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन – मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट स्थापन केला असून, या माध्यमातून हे महाविद्यालय चालवले जाणार आहे. महाविद्यालयासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेत अंदाजपत्रकात तरतूद प्रस्तावित केली आहे. यानंतर महापौर झाल्यावरही त्यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. तत्कालिन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दीड वर्षांपूर्वी या महाविद्यालयाच्या मान्यतेचा प्रस्ताव मुख्यसभेत मंजूर केला.
गेल्या वर्षभरात महाविद्यालयाच्या कामकाजाला गती देण्यात अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुढाकार घेत माजी आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे आणि विद्यमान आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती यांच्यासह सहायक आरोग्य प्रमुख अंजली साबणे यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र कक्ष सुरू केला होता. या माध्यमातून महाविद्यालयाच्या मान्यतेसाठीच्या सर्व आवश्यक कागदपत्रे संकलन, ट्रस्टची स्थापना, आरोग्य विज्ञान विद्यापीठासह राज्यशासनाकडे पत्रव्यवहार, प्रस्तावित त्रुटींची पूर्तता करणे सुरू होते.
यावर बुधवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक असल्याने आरोग्य प्रमुख डॉ. भारती यांनी मंगळवारी नाशिकमध्ये जाऊन संबंधित प्रस्तावांच्या त्रुटींची पूर्तता केली. त्यानंतर अखेर आरोग्य विज्ञान विद्यापीठाने महाविद्यालयास मान्यता दिल्याने महाविद्यालयाच्या मान्यतेचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
पुढील शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयात 100 जागांचे प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली असली, तरी अद्याप राज्य, केंद्रशासनाच्या मान्यता आणि मान्यतांसाठी राज्य तसेच केंद्रीय पथकांकडून महाविद्यालयाची जागा, आवश्यक पायाभूत सुविधांची पाहणी असे आणखी महत्त्वाचे टप्पे पुढील चार महिन्यांत पार पडल्यानंतरच महाविद्यालयास अंतिम मान्यता मिळणार आहे.