‘मीडिया आता आमचे मित्र नाहीत’; राहुल गांधींचा आरोप – “ते केवळ अदानी, अंबानी, मोदींनाच दाखवतात”

गुवाहाटी – “माध्यमे आता आमचे मित्र राहिलेली नाहीत. त्यांना सत्य दाखवायची सवयच राहिलेली नाही,” अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांवर घणाघाती टीका केली. आसाममधील चायगाव येथे आयोजित काँग्रेसच्या सभेत ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, “माध्यमे दिवसभर अंबानी, अडाणी, मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांचे चेहरे दाखवत राहतात. लोकांचे खरे प्रश्न आणि सत्य माध्यमांमध्ये दिसत नाही. मात्र हे काही फार काळ चालणार नाही. आसामच्या जनतेला सत्य ठाऊक आहे. लवकरच निवडणुका होतील आणि काँग्रेस विजयी होईल.”
ते पुढे म्हणाले, “देशात विचारधारेची लढाई सुरू आहे – एकीकडे आरएसएसची द्वेष आणि हिंसेवर आधारित विचारधारा, तर दुसरीकडे काँग्रेसची सत्य आणि अहिंसेची भूमिका. आज भारतात दोन प्रकारचा देश तयार झालाय – एक अतिश्रीमंतांच्या भव्य लग्नसोहळ्यांचा आणि दुसरा सामान्य जनतेचा, जो कराच्या ओझ्याखाली दबलेला आहे.”
#WATCH | Kamrup, Assam | Addressing a public rally in Chhaygaon, Lok Sabha LoP & Congress MP Rahul Gandhi says, “I called the people of media as my friends. I said ‘Media ke Hamare Mitra’, but they are not our friends. Because nowadays they are not used to showing the truth.… pic.twitter.com/1SAsrvxlT9
— ANI (@ANI) July 16, 2025
मुख्यमंत्री सरमा यांच्यावर थेट आरोप –
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना राहुल गांधी म्हणाले, “ते स्वतःला राजा समजतात, पण लवकरच आसामची जनता त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जेलमध्ये पाठवेल.”
निवडणूक आयोगावरही आरोप –
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरही टीका करताना म्हटले, “भाजपा आणि निवडणूक आयोग एकत्रितपणे काम करत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने मतदार यादीत फेरफार करून विजय मिळवला. हेच ते बिहार आणि आसाममध्येही करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला सावध राहण्याची गरज आहे,” असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.





