Pune: मराठा समाजाला जागतिक उद्योजकीय नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी, मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन (एमईए) च्या वतीने ‘एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. एका समाजाने आयोजित केलेले हे भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक प्रदर्शनांपैकी एक ठरणार असून, दि. २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी पुण्याच्या ॲग्रीकल्चरल ग्राउंड येथे हे प्रदर्शन पार पडणार आहे. ‘एकतेतून समृद्धीकडे’ आणि ‘मराठा समाज – उद्योजक समाज’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या एक्स्पोमध्ये देश-विदेशातील मराठा उद्योजक, गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स एकाच छताखाली येणार आहेत. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात उद्योगांच्या विविध क्षेत्रांचा समावेश असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, अॅग्रो-टेक, एफएमसीजी, ऑटोमोबाईल, बँकिंग व फायनान्स, हेल्थ, शिक्षण आणि हॉस्पिटॅलिटी यांसारख्या ५०० हून अधिक स्टॉल्सची मांदियाळी असेल. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय व्यापार संस्था, शासकीय प्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांची उपस्थिती लाभणार असल्याने उद्योजकांसाठी हे एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. हे एक्स्पो केवळ प्रदर्शन नसून ती एक व्यावसायिक चळवळ आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या उद्योजकांना जागतिक दर्जाचे नेटवर्किंग, नवीन भागीदारी आणि थेट गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळेल. जागतिक बाजारपेठेत व्यवसाय विस्तार कसा करावा, याचे मार्गदर्शनही तज्ज्ञांकडून दिले जाणार आहे. नवीन कल्पनांना वाव मिळण्यासाठी आणि धोरणात्मक सहकार्य वाढवण्यासाठी हे प्रदर्शन मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गेल्या दशकभरापासून मराठा उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘एमईए’चे आज २,००० पेक्षा अधिक सभासद आहेत. २०० हून अधिक यशस्वी उपक्रम राबवणाऱ्या या संस्थेचा मुख्य उद्देश समाजातील उद्योजकांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम करणे हा आहे. संघटनेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला उपस्थित राहून संधी, नवकल्पना आणि सहकार्याचा जागतिक अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी आणि उद्योगप्रेमींनी या जागतिक अनुभवाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.