MD Drug Factory – अंधेरीतील सहार रोड परिसरात एमडी (सिंथेटिक ड्रग्स) तयार करणाऱ्या एका फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याठिकाणी केवळ 13 हजार रुपये भाड्याच्या एका छोट्या खोलीतून तब्बल 30 कोटींचा ड्रग्स व्यवसाय चालवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फॅक्टरीतून मोठ्या प्रमाणावर ड्रग्स उत्पादन आणि पुरवठा केला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी कुख्यात ड्रग तस्कर मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास शेख (44) याला अटक केली आहे. शेख हा गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला असून, गेल्या काही काळापासून तो मुंबईत सक्रिय होता. आरोपीने अंधेरीतील भास्कर चाळीत भाड्याने खोली घेतली होती. साध्या सेटअपमध्येच हे ड्रग्स तयार करण्याचे काम सुरू होते. तो या स्थानिक भागात ड्रग्ज विक्री टाळून बाहेरील नेटवर्कद्वारे सप्लाय करत होता. यातून दरमहा 25 ते 30 कोटींच्या ड्रग्सची निर्मिती करून ती विविध भागात पाठवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. MD Drug Factory दरम्यान, खार पोलिसांनी गस्तीदरम्यान आरोपीला संशयास्पद स्थितीत ताब्यात घेतले होते. तपासावेळी त्याच्याकडून 15.44 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि मोबाईल जप्त करण्यात आला.पुढील चौकशीत हे संपूर्ण रॅकेट उघड झाले आहे. यानंतर पोलिसांनी या खोलीवर छापा टाकत, रसायने आणि उपकरणे जप्त केली आहेत. यात आरोपीचा साथीदार रिजवान अहमद लियाकत अली याला उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथून अटक करण्यात आली आहे. यावरून, ड्रग्स नेटवर्क मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात, आरोपीची पत्नी नसरीन ही या ड्रग्सऱ्या पैशांचा हिशोब ठेवत होती, असे समोर आले आहे. तिच्या बँक खात्यातील 26 लाख रुपये पोलिसांनी गोठवले आहेत. मोहम्मद आरिफ शेखवर आधीच 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुजरातमधील ड्रग्स प्रकरणात त्याला 10 वर्षांची शिक्षा झाली होती. 2023 मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला होता.