इस्तंबुल (तुर्कीये) : दक्षिण तुर्कीतील तीन प्रमुख शहरांच्या महापौरांना शनिवारी अटक करण्यात आली. तुर्कीयेमध्ये विरोधकांना ताब्यात घेण्याचे मोठे सत्र सरकारद्वारे सुरू करण्यात आले आहे. तीन विरोधी महापौरांना झालेली अटक ही त्या सत्राचा भाग आहे. इस्तंबुल शहराचे महापौर मार्च महिन्यापासून तुरुंगातच आहेत. त्यात आता आणखी 3 शहरांच्या महापौरांची भर पडली आहे. आदियामानचे महापौर अब्दुर्रहमान तुतदेरे आणि अदाना नगरपालिकेचे प्रमुख झेयदान करालार यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या घरांवर छापे घालून ताब्यात घेण्यात आले. दोघेही मुख्य विरोधी रिपब्लिकन पीपल्स पार्टी किंवा सीएचपीचे सदस्य आहेत. तर अंतल्याच्या मुख्य सरकारी वकिलांच्या कार्यालयाने लाचखोरीच्या एका वेगळ्या प्रकरणाच्या चौकशीत इतर दोन संशयितांसह अंतल्याचे सीएचपी पक्षाचे महापौर मुहितिन बोसेक यांना देखील अटक केली आहे. तुर्कीयेतील विरोधी पक्षाला नामशेष करण्यासाठी सरकारकडून धडक कारवाई करत विरोधकांच्या अनेक नेत्यांना अटक केली जाते आहे. अलिकडच्या काही महिन्यांत सीएचपीच्या नियंत्रणाखाली असलेल्या नगरपालिकांमधील अनेक अधिकाऱ्यांना अटक केली गेली आहे. त्यानंतर आता महापौरांना अटक करण्यात आली आहे. सीएचपीच्या नगरपालिकांच्या महापौरांना अटक करण्याचे सत्र सुरू करण्यात आल्यानंतर सीएचपीचे अध्यक्ष ओझगुर ओझेल यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची बैठक बोलावली आहे. अध्यक्ष रेसिप एर्दोगन यांच्याकडून विरोधकांना सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जाऊ लागली आहे.