महापौरांचे चुकलेच…!

विरोधी पक्षनेते नाना काटेंची टीका

पिंपरी – महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात त्यामुळे जलपूजनानंतर झालेला हवेतील गोळीबारासारखा प्रकार चुकीचाच असल्याची टीका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलताना केली.
पवना धरणावर महापौर जाधव यांनी बुधवारी जलपूजन केले. त्यानंतर पत्रकार, महापालिका, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली होती.

महापौर जाधव काही अधिकारी, कार्यकर्ते व पत्रकारांसमवेत हॉटेलपासून काही दूर अंतरावर होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना नवीन पिस्तूल दाखविली. त्यावरुन गप्पांचा फड रंगला असताना महापौरांनी गोळीबाराचा सराव करण्यासाठी दोन राउंड फायर केल्याची जोरदार चर्चा आहे. आपण केवळ भिजलेली पिस्तूल साफ केली परंतु, गोळीबार केला नसल्याचा दावा महापौरांनी केला आहे. महापौरांचे पिस्तूल हाताळतानाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून सर्वस्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

जलपूजनाच्या वेळी विरोधी पक्षनेते काटे हे देखील उपस्थित होते. याबाबत त्यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की, शहराचे प्रथम नागरिक या नात्याने असा प्रकार करताना महापौरांनी विचार करायला हवा होता. झालेला प्रकार हा अत्यंत चुकीचा असल्याचे काटे यांनी सांगितले. महापौरांनी गोळीबार केला त्यावेळी आपण त्यांच्या समवेत नव्हतो. त्यामुळे महापौरांना गोळीबाराचा सराव करताना आपण प्रत्यक्ष पाहिले नाही. परंतु, त्याठिकाणी त्याबाबतची चर्चा रंगली होती, असे काटे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.