Nandurbar Politics | नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. नवापूर येथून भाजप विरोधात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे. अवैध मद्य तस्करी प्रकरणी गुजरात पोलिसांनी या निवडणुकीत एन्ट्री केली. त्यांच्यावर गुजसी टॉक अर्थात गुजरात दहशतवाद आणि संघटीत गुन्हे नियंत्रण कायदा कायदा २०१५ च्या कलम ३(१)(२) आणि कलम ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर पालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे जयंत जाधव, भाजपातर्फे अभिलाषा वसावे पाटील तर काँग्रेसतर्फे दिपचंद जयस्वाल यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर पालिकेसाठी जिल्हा विकास आघाडीतर्फे विश्वास बडोगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करत पूर्ण पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांना माजी आमदार शरद गावित यांनी त्यांच्या पॅनलला पाठिंबा देत शक्तिप्रदर्शन करीत प्रचार फेरीही काढली होती. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा विकास आघाडीतर्फे अपक्ष लढणाऱ्या विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. विश्वास बडोगे यांच्यावर माघारीसाठी प्रचंड दबाव होता. मात्र त्यांनी नकार दिल्यानेच त्यातूनच त्यांना अटक झाल्याचा चर्चा सध्या नवापुरमध्ये रंगत आहे. विशेष म्हणजे म्हणजे ही कारवाई गांधीनगर पोलिसांनी केली. बडोगे यांना त्यांच्या राहत्या घरातून नवापूर येथून अटक करण्यात आली. याविषयी स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती. ही अटक नवापूर येथून केली असताना त्याची नोंद मात्र भडभुंजा पोलीस ठाण्यात दाखविण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत ही कारवाई केली. आमचा कॅप्टन जरी आत असला तरी कोच बाहेर या कारवाईनंतर माजी आमदार शरद गावीत यांनी, “आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वास बडोगे राजकीय षडयंत्राचे बळी ठरले. प्रचारात आघाडी घेतल्यानेच सत्ताधाऱ्यांनी हा रडीचा डाव खेळला. आमचा कॅप्टन जरी आत असला तरी कोच बाहेर आहे. आम्ही सर्व शक्तीनिशी त्या विरोधात लढा देऊ,”असे म्हंटले आहे. दरम्यान, बडोगे यांच्यावरील कारवाई ही संशयास्पद असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. यावरून आता नवापूर नगरपालिका निवडणुकीचे राजकारण तापले आहे. हेही वाचा : लग्नाच्या १० महिन्यातचं मृत्यूला कवटाळलं; पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीने जीवन का संपवलं? धक्कादायक माहिती समोर