कराड -कराड शहरात करोनाबाधित रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना करोना वॉरियर्स म्हणून शहरात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा करोना अहवाल बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. तसेच भाजपप्रणित आघाडीच्या नगरसेवकांसह त्यांच्या संपर्कातील नगरसेवक, पालिका अधिकारी, कर्मचारी, भाजपमधील कार्यकर्ते तसेच अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून दगदग व धावपळ झाल्याने दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे माझी करोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच ठीक होऊन पुन्हा तुमच्या सेवेस हजर असेन. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून शहरातील परिस्थितीचाआढावा घेत राहीन, अशी प्रतिक्रिया रोहिणी शिंदे यांनी दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी बुधवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील बाधितांचा आकडा 546 वर पोहाचला आहे. कराड शहरात नवीन दोघे करोनाबाधित झाले आहेत. शहरातील बाधितांची संख्या 28 झाली आहे. सध्या कराड शहरात सात कंटेनमेंट झोन आहे. करोनाचा प्रार्दुभाव कमी होण्यासाठी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामाला सुरूवात केली होती. जनजागृतीसह नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्या आग्रही होत्या. महसूल, पोलीस, आरोग्य तसेच पालिकेच्या प्रत्येक बैठकीला हजेरी लावून करोनाच्या लढ्यात त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून नगराध्यक्षा शिंदे यांना करोनासदृश्य त्रास होऊ लागल्याने त्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या. यावेळी त्यांचे स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला असून त्यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच कराड शहरात खळबळ उडाली. त्यांच्या निकट सहवासातील व्यक्तींचा तपास सुरू आहे. नगराध्यक्षा करोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या भाजपप्रणित आघाडीसह त्यांच्या संपर्कातील नगरसेवक, पदाधिकारी तसेच पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी कृष्णा हॉस्पिटलमधून प्राप्त झालेल्या अहवालानुसार कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे करोनाबाधित आहेत. त्यांच्या निकट सहवासातील लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सांगितले.