Mayor Election : मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदावरून सुरू असलेल्या राजकीय कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाणे महानगरपालिकेतही सत्तावाटपाचा तीव्र वाद निर्माण झाला आहे. ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानले जातो, तिथेच भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे आमदार आणि ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,”ठाणे महानगरपालिकेत किमान दोन वर्षांसाठी महापौरपद भाजपला मिळावे, अन्यथा आम्ही सत्तेत राहणार नाही आणि थेट विरोधी बाकावर बसू.” भाजपची मजबूत मागणी आणि कामगिरीचा दावा निरंजन डावखरे यांनी ठाण्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना सांगितले,”शीळ ते वडवली या पट्ट्यात भाजपने अत्यंत प्रभावी काम केले आहे. आम्हाला ज्या जागा वाट्याला आल्या, तिथे आम्ही १०० टक्के स्ट्राईक रेट राखला आहे. आमची ताकद वाढली असून, कार्यकर्त्यांची स्पष्ट इच्छा आहे की ठाण्याचा महापौर भाजपचा असावा.” ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने (शिंदे गट शिवसेना + भाजप) एकूण वर्चस्व राखले असले तरी, पक्षीय जागांच्या तुलनेत शिंदे गटाला ७५ जागा मिळाल्या असून, त्यांच्याकडे स्वतंत्र बहुमत आहे. तर भाजपला २८ जागा मिळाल्या आहेत. बहुमत असूनही सत्ता टिकवण्यासाठी भाजपची साथ शिंदे गटाला महत्त्वाची ठरते. शिंदे सेनेसमोर मोठा पेचप्रसंग डावखरे यांनी म्हटले आहे, “बहुमत त्यांच्याकडे असले तरी आमचा सन्मान झाला पाहिजे. दोन वर्षांसाठी महापौरपद हा आमचा हक्क आहे.” या भूमिकेमुळे आगामी काळात ठाण्यातील महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युती धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईच्या राजकारणाचे पडसाद ठाण्यात? मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली जोरात सुरू असताना, ठाण्यात भाजपने आपला दावा ठोकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही भूमिका मुंबईतील राजकीय दबावतंत्राला प्रत्युत्तर म्हणून पाहिली जात आहे. आता शिंदे गट यावर काय भूमिका घेतो आणि सत्तावाटपाचा मार्ग कसा काढला जातो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ठाण्यातील ही घडामोड महायुतीतील अंतर्गत समीकरणांना नवे वळण देणारी ठरू शकते.