मायावतींनी उघड केली पंतप्रधानपदाची आकांक्षा

संधी मिळाल्यास केंद्रात सर्वोत्तम सरकार देण्याची ग्वाही
विशाखापट्टणम्‌ – बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी अप्रत्यक्षपणे का होईना पंतप्रधानपदाची आकांक्षा उघड केली आहे. संधी मिळाल्यास केंद्रात सर्वोत्तम सरकार देण्यासाठी उत्तरप्रदेशची मुख्यमंत्री म्हणून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग करू, असे त्यांनी म्हटले आहे.

आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर असणाऱ्या मायावती यांची बुधवारी येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पंतप्रधान बनण्यास आवडेल का, असा प्रश्‍न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले. मी चारवेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भुषवले. त्यामुळे माझ्याकडे मोठा अनुभव आहे. त्याचा उपयोग केंद्रात आणि लोककल्याणाच्या कार्यासाठी मी करेन. अर्थात, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या दिवशी म्हणजे 23 मेस चित्र स्पष्ट होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. देशातील जनतेला राष्ट्रीय पातळीवर बदल हवा आहे. आपल्या कल्याणाची काळजी घेणारा पक्ष जनतेला सत्तेत हवाय. जनतेला सुरक्षित देश हवा आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसनंतर बसपला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, याकडे लक्ष वेधत मायावती यांनी पंतप्रधानपदासाठी दावा दाखल केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.