पुणे : “अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून ज्या अविवेकाने केला त्या समाजात विवेकवादी विचार पेरणे, हे फार आव्हानात्मक कार्य आहे” असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे जेष्ठ अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी केले. ते पुणे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहा पुस्तिकांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, “सध्या ज्ञान विरोधी लोक मोकाट आहेत तर ज्ञानमार्गी लोक मुकाट आहेत, अश्या काळात आपण जगत आहोत. कुतूहल जागं करणं, प्रश्न विचारायला लावणं हे विद्यापीठाचे मूलभूत कार्य आहे. मात्र सामाजिक सत्ता व्यवहार यांच्या दबवापुढे विद्यापीठं ज्ञान निर्मितीपासून दूर जात आहेत. सध्या प्रश्न विचारले की भावना दुखावत आहेत. त्यामुळे विचार मांडण्याचा अवकाश आकुंचन पावत आहे. व्यक्तिगत विवेक आणि सामाजिक विवेक यात फरक का पडत आहे या प्रश्नांला विवेकवाद्यांनी भिडावे लागेल.” सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “मी ज्या क्षेत्रात काम करते, त्याला वेगळं ग्लॅमर आहे, त्याचा उपयोग अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम चार अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी होईल, या भावनेने मी आज इथे आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचा प्रसार मी हिरीरीने करेन.” डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहा पुस्तिकांचा अनुवाद विल्सन कॉलेजमध्ये इंग्रजीचे अध्यापन करणाऱ्या प्रा. राही डहाके यांनी केला आहे. त्या म्हणाल्या “डॉ. दाभोलकरांच्या पुस्तिकांचा अनुवाद करताना मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे मी डॉ. दाभोलकरांच्या अन्य साहित्याचा अनुवादही आनंदाने करेन,” असं सोनाली कुलकर्णी म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलं. ते म्हणाले, “ डॉ. नरेंद्र दाभोलकरांची सत्यशोधक विद्यापीठ सुरू करण्याची इच्छा होती. ही कल्पना अंनिस आता डिजिटल स्वरूपात प्रत्यक्षात आणत आहे. शेतीतज्ञ श्री. अ. दाभोलकर ‘मोकाट विद्यापीठ’ संकल्पना मांडायचे. जिथे कोणीही येवून शिकू शकतो, प्रश्न विचारू शकतो. या लोकविद्यापीठातही सर्वांना प्रवेश आहे.