पिंपरी | मावळात युनिट नोंदणी आणि स्काऊटर गाईड उजळणी

कार्ला, (वार्ताहर) – पिंपरी पुणे भारत स्काऊटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने या
चालू शैक्षणिक वर्षातील एक दिवसीय युनिट नोंदणी आणि स्काऊटर गाईडर उजळणी वर्गाला उत्साहात सुरूवात झाली. दिनांक १५ जुलै ते १३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत पुणे जिल्ह्यात सदर उजळणी वर्ग होत आहेत. मावळ तालुक्यात छत्रपती शिवाजी विद्यामंदिर शाळेत पहिल्या उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
गटशिक्षणाधिकारी तथा सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी शोभा वहिले यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड प्रार्थनेने उजळणी वर्गाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक कैलास पारधी, जिल्हा संघटक स्काऊट दिगंबर करंडे, जिल्हा संघटक गाईड उषा हिवराळे, बिलाकोस अन्सारी, केंद्रप्रमुख पांडुरंग डेंगळे आदी उपस्थित होते.
उपस्थित ९१ शाळेतील स्काऊटर आणि गाईडर यांना कब बुलबुल, स्कॉऊट गाईड प्रवेश, तृतीय सोपान, विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी याबाबत जिल्हा संघटक स्कॉऊटचे दिंगबर करंडे, उषा हिरवाळे, सुजाता तारळकर, शशी दगडे, अनिल कळसकर, संपत चव्हाण, संदीप सपकाळ यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर करंडे यांनी केले. मावळ तालुकास्तरीय स्काऊटर गाईडर उजळणी वर्गाचे उत्कृष्ट व यशस्वी आयोजन करण्यासाठी स्काउट गाईडच्या तालुका समन्वयक बिलाकोस अन्सारी यांनी परिश्रम घेतले. गाईड शिक्षक आणि शिपाई विनोद उमाप यांनी मदत केली. तालुका प्रतिनिधी संदीप सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.





