रांजणी : आंबेगाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कळंब – चांडोली जिल्हा परिषद गट महिला सर्वसाधारण राखीव घोषित झाला आहे. या मतदारसंघात महिला इच्छुकांचा उत्साह ओसंडून वाहत असून हा गट महिला राखीव झाल्याने अनेकांनी आपल्या सौभाग्यवतींसाठी राजकीय दालने खुली केली असल्याचे दिसून येते. दरम्यान हा जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. एक वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांना या जिल्हा परिषद गटामध्ये दोन हजाराहून अधिक कमी मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांना मतांची आघाडी मिळाली होती. अशा परिस्थितीत आता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत या गटात कोण बाजी मारणार हा प्रश्न महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची सध्याची पार्श्वभूमी पाहता या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हे तीनही पक्ष एकत्र येऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविणार आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा, अशी युती राहण्याची शक्यता असून या सर्व पार्श्वभूमीवर कोण बाजी मारणार ? हा येणारा काळच ठरवेल. मात्र, सध्या तरी कळंब-चांडोली जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहील, असे दिसून येते. कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटात सध्या शिवसेना पक्षाच्या चांडोलीच्या माजी सरपंच प्रीती प्रवीण थोरात, तसेच नीलम संतोष भालेराव, मयुरी कुंडलिक वाबळे या इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तुलसी भोर यांच्या नावांची चर्चा आहे. या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या इच्छुक असलेल्या उमेदवार तुलसी भोर या २०१७ साली निवडून आल्यानंतर त्यांचा या गटातील मतदारांशी फारसा संपर्क राहिला नसल्याचे मतदारांमध्ये बोलले जात आहे. अजित पवार गटाची प्रतिष्ठा पणाला सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे एकत्र होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलसी भोर या विजयी झालेल्या होत्या. आताची परिस्थिती मात्र पूर्णतः वेगळी आहे. या वेळच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार गट स्वतंत्र झाला असून त्यांना एकनाथ शिंदे गट शिवसेनेची देखील साथ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कळंब -चांडोली जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव असला तरी या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.