Pimpri : मावळचा इंद्रायणी तांदूळ महागणार

टाकवे : मावळ तालुक्यात यंदा भात लागवडीच्या हंगामावर पावसाचा प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, यंदा इंद्रायणी तांदळाचे दर वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शेतकरी वर्गामध्ये त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस भाताची पेरणी केली जाते. मात्र यंदा पावसाने मे महिन्याच्या सुरुवातीलाच हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची पेरणी नियोजित वेळेत होऊ शकली नाही. वेळेआधी आलेल्या पावसामुळे रोपांची वानवा निर्माण झाली, त्यामुळे नियोजित क्षेत्रात लागवड होऊ शकली नाही.
या परिस्थितीमुळे काही जमीन ओस राहणार, तर काही ठिकाणी लागवड अपुरी होणार आहे. त्यामुळे तांदळाचे एकूण उत्पादन घटणार आहे. स्वतःच्या गरजेपुरता तांदूळ मिळेल का, याचीही चिंता सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. याचा सरळ परिणाम तांदळाच्या बाजारभावांवर होणार असून, मागणी अधिक आणि उत्पादन कमी असल्याने दरवाढ होणार हे निश्चित मानले जात आहे. दरवर्षी मावळातील प्रसिद्ध इंद्रायणी तांदळासाठी महाराष्ट्रभरातून ग्राहक येत असतात. यंदा मात्र तांदूळ उपलब्ध असलेले काहीच शेतकरी याचा फायदा घेऊ शकतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.





