Maval News – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मावळच्या निवडणुकीच्या प्रचाराचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. दोन दिवस प्रचार पूर्णपणे ठप्प होता. निवडणुकीसाठी दिवस कमी उरल्याने अखेर तिसऱ्या दिवशी उमेदवारांनी प्रचारास पुन्हा सुरुवात केली. परंतु ना घोषणा, ना रॅली, ना स्पीकर पूर्णपणे शांततेत प्रचार सुरू होता. कोणत्याही निवडणुकीसाठी पहिल्यांदा एवढ्या शांततेत प्रचार मावळवासीयांनी पाहिला. अजितदादांच्या अपघातील निधनानंतर सर्व राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचार पूर्णपणे थांबवण्यात आला होता. गजबजलेले चौक शांत झाले होते, सभा रद्द करण्यात आल्या, आणि सोबतच प्रचाराचा आवाजही थांबला. दादांच्या अपघातामुळे संपूर्ण राज्यात शोककळेचे वातावरण पसरले होते. गावोगावी शोकसभा घेण्यात आल्या, नागरिकांनी मौन पाळले आणि राजकीय हालचालींना आपोआप विराम मिळाला. आता मावळ तालुका पुन्हा हळूहळू पुर्वपदावर येऊ लागला आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखवट्याच्या काळात तालुक्यातील वातावरण पूर्णपणे बदलले होते. प्रचार कार्यालये बंद होती, झेंडे खाली उतरवले होते आणि कार्यकर्ते घरीच थांबले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी दुःखात सहभाग घेतला होता. हा काळ केवळ औपचारिक नव्हता, तर खऱ्या अर्थाने भावनिक असल्याची जाणीव यावेळी प्रत्येकाला झाली. अजितदादा पवार आज मात्र त्या शांततेनंतर पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत.एरवी निवडणूक काळात मावळ तालुक्यात मोठ्या रॅली, प्रचारगाड्यांचे ताफे आणि डीजेच्या तालावर घोषणा ऐकू येतो. मात्र मनातल्या शोककळेमुळे आता प्रचाराचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी सामंजस्याने निर्णय घेत कोणत्याही प्रकारचा गोंगाट टाळण्याचे ठरवले आहे. त्यामुळे गावागावांत प्रचार असूनही वातावरणात शांतता जाणवत आहे. राजकीय पक्षांनी प्रचार करताना संयम पाळावा, अशी स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. यामुळे प्रचार सुरू असला तरी तो अत्यंत गंभीर स्वरूपात चालू आहे. रॅलीऐवजी संवादाचा मार्ग प्रचाराचे स्वरूप आता मोठ्या सभांवरून थेट मतदारांशी संवादाकडे वळले आहे. उमेदवार आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना भेटत आहेत. वाडी-वस्त्यांवर छोट्या बैठका घेऊन स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली जात आहे. या भेटींमध्ये राजकीय भाषणांपेक्षा मतदारांच्या समस्यांवर अधिक भर दिला जात आहे. अनेक उमेदवार स्वतः मतदारांच्या घरांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. प्रचार शांत, पण भावनांनी भारलेला सध्याचा प्रचार हा केवळ निवडणुकीचा भाग नाही, तर तो एका भावनिक टप्प्यातून जाण्याची प्रक्रिया आहे. दुःख मनात असतानाच जबाबदारी पार पाडण्याचा हा काळ आहे. त्यामुळे प्रचार सुरू असला तरी त्यात आक्रमकता नाही, गाजावाजा नाही, तर संयम आणि संवेदनशीलता आहे.