Maval News – निवडणुकीच्या प्रचाराने तापलेला मावळ तालुका बुधवारपासून अचानक शांत झाला. परवापर्यंत सभा, रॅली, गाड्यांचा ताफा, ढोल-ताशे आणि घोषणांनी गजबजलेले वातावरण आज मात्र स्तब्ध झाले होते. कारण होतं महाराष्ट्राचे लाडके लोकनेते अजित पवार यांचं निधन. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर इतर सर्व पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकत्र्यांना अजितदादांच्या निधनाने धक्का बसला आहे. बुधवारच्या सकाळी सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीत मग्न होते. पण वाऱ्याची झुळूक येत दिव्याची ज्योत विझावी, तशी वाऱ्यासारशी बातमी पसरली, लाडक्या दादांच्या अपघाती निधनाची. कार्यकर्त्यांचा आधार हरवला आणि पदाधिकाऱ्यांचं नेतृत्वही, सारंकाही सुन्न झालं, प्रत्येकासाठी वेळ थांबली आणि धावत्या वर्दळीसोबत निवडणुकांचा प्रचारही. सर्वसामान्य जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचे प्रतिबिंब या भयाण शांततेत दिसत होते. राजकीय प्रचार थांबवण्यामागे कुठलाही आदेश नव्हता, कुठली सक्तीही नव्हती. ही शांतता जनमाणसाने आपोआप स्वीकारलेली होती.मागील काही दिवसांपासून मावळ तालुका निवडणूक प्रचारामुळे पूर्णपणे गजबजलेला होता. सकाळीपासून रात्री उशिरापर्यंत उमेदवारांचे दौरे, कार्यकर्त्यांच्या भेटी, घरोघरी प्रचार, चौकाचौकात सभा आणि गाड्यांवरून होणाऱ्या घोषणा सुरू होत्या. प्रत्येक गावात सर्व राजकीय पक्षांचे झेंडे, पोस्टर आणि बॅनर झळकत होते. अजित पवार राजकारणाला संवेदनांचा विराम निवडणूक म्हणजे स्पर्धा, मतांची लढाई आणि प्रचाराची धावपळ असते. मात्र, आज मावळात या सगळ्यावर मानवी संवेदनांनी विराम दिला. प्रचार थांबवण्याचा निर्णय राजकीय डावपेच नव्हता, तर ती सामाजिक भावना होती. अजितदादांच्या निधनाची बातमी पसरताच मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपापसात संपर्क साधून प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांकडून कोणतीही सभा, रॅली, प्रचार फेरी किंवा घराघरांत प्रचार होणार नाही, याची काळजी घेतली. सोबतच पुर्वनियोजित असलेल्या अनेक सभा आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले. सोबतच उमेदवारांचे दौरे स्थगित करण्यात आले. भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न तालुक्यातील राजकारण थांबले. प्रचार थांबला, मतांची चर्चा थांबली, आरोप प्रत्यारोप थांबले. उरली फक्त भयाण शांतता आणि अजितदादांच्या गोड आठवणी. अनेक कार्यकर्त्यांनी दादांसोबतच्या छायाचित्रांचा आधार घेत आपल्या भावना व्यक्त केल्या, तर अनेक नागरिकांनी दादांची गाजलेली भाषणे ऐकत ते आपल्यातच आहेत, अशी स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात इंदोरी, टाकवे बुद्रुक, वडगाव, तळेगाव, कामशेत, पवनानगर आदी परिसरातील नागरिक आणि स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत आदरांजली अर्पण केली.