प्रभात वृत्तसेवा पिंपरी – मावळ तालुक्यातील शिरगाव येथे एक धक्कादायक घटना रविवारी (दि. १४ डिसेंबर) रोजी सकाळी उघडकीस आली. एका पाच वर्षीय मुलीचे तिच्या घराजवळ राहणाऱ्या व्यक्तीने चॉकलेटच्या आमिषाने अपहरण केले. त्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह फेकून दिला. दरम्यान, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. समीर कुमार मंडल (वय ३२, रा. शिरगाव, मूळ रा. झारखंड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मयत मुलीच्या २७ वर्षीय आईने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीचे कुटुंब कामानिमित्त शिरगाव येथे वास्तव्य करत आहे. त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूला आरोपी राहत होता. त्यामुळे मुलगी आणि आरोपी यांची तोंडओळख होती. शनिवारी सायंकाळी मुलगी तिच्या भावासोबत घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपी समीर तिथे आला. त्याने मुलीला चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवले. तिला समीर याने दुकानात नेले आणि तिथून तिला पुढे घेऊन गेला. घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर उर्से येथे तिला नेले.शनिवारी सायंकाळी मुलगी परिसरात दिसत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र ती मिळून आली नसल्याने कुटुंबीयांनी शिरगाव पोलिसात धाव घेतली. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरगाव पोलिसांसह गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रभर शोधाशोध केली मात्र ती मिळून आली नाही. रविवारी सकाळी उर्से येथे एका कंपनीजवळ मोकळ्या मैदानात मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी समीर मंडल याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याने मुलीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे. मुलीचा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या अहवालानंतर लैंगिक अत्याचार झाला अथवा नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त कोपनर यांनी सांगितले.