निकालाची उत्सुकता शिगेला : कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 316 जागांसाठी शुक्रवारी (दि. 15) झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी (दि. 18) तळेगाव दाभाडे येथे सकाळी 10 वाजता होणार असून, दुपारी 12 वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे व संतोष सोनवणे यांनी दिली. शुक्रवारी (दि. 15) मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीसाठी 150 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावला. एकूण 82 हजार 519 पैकी 67 हजार 402 म्हणजे 81.68 टक्के मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रावरील मतदान मशीन तळेगाव दाभाडे येथील पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलमध्ये जमा करण्यात आल्या. सोमवार (दि. 18) सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार असून, 32 टेबल व 100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक व सहायक मतमोजणी असे नियुक्त केले आहे. सर्व 32 टेबलवर एकाच वेळी मतमोजणी सुरू होणार असून चार ते पाच फेऱ्यांमध्ये संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून प्रवेश पास घ्यावा लागेल. यापूर्वीच्या सर्व निवडणुकांची मतमोजणी तालुका मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ येथे झालेल्या आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी वडगाव मावळ येथे होत होती. मात्र यावेळी जागेच्या अडचणीमुळे ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रथमच तळेगाव दाभाडे येथे होत आहे. या वेळी राज्य राखीव पोलीस बल 25 व सहा पोलीस ठाण्यामधील 200 अधिकारी व कर्मचारी असे एकूण 225 अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.