प्रभात वृत्तसेवा आळंदी – संत ज्ञानेश्वर माउलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (750 वा) जन्मवर्षानिमित्त यंदाचा 15 ऑगस्ट गोकुळाष्टमीचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणार आहे. या दिवशी सायंकाळी पाच ते सात या वेळेत माउलींची प्रतिमा अथवा मूर्ती पालखीत ठेवून मिरवणूक काढण्याचे नियोजन राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना या मिरवणुकीच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, नगरविकास विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयाचे श्रेय आळंदी देवस्थानच्या मागणीला जाते. कृष्ण जन्माष्टमी व माउलींच्या जन्मतिथीचा योग यंदा एकाच दिवशी आल्याने, हा दिवस राज्य उत्सव म्हणून साजरा व्हावा, अशी मागणी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ व विश्वस्त मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास विभागाला सुचना दिल्या. आळंदीमध्ये विविध उपक्रमांद्वारे हा सोहळा साजरा केला जात आहे. नव्याने साकारलेली चांदीची पालखी, चांदीचा दरवाजा, समाधी मंदिरासाठी अकरा किलो सोन्याचा कळस तयार करण्यात आला असून, तो कळस 15 ऑगस्टला माउलींच्या समाधी मंदिरावर चढवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजनही सुरू आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर व पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले आहे.