माउली सोहळ्यासाठी जास्तीत जास्त सुविधा देणार

लोणंद – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून वारकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून त्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. कुठेही गैरसोय होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
माउलींचा पालखी सोहळा शनिवारी (दि. ६) सातारा जिल्ह्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लोणंद पालखीतळ, पालखी मार्ग आदी ठिकाणी भेटी देऊन सोहळ्याच्या व्यवस्थेबाबत श्री. डुडी यांनी पाहणी दौरा केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, वाईचे प्रांत राजेंद्रकुमार जाधव, फलटणचे प्रांत सचिन ढोले, तहसीलदार अजित पाटील, पोलिस उपअधीक्षक राहुल धस, नगराध्यक्ष सीमा खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, लोणंद बाजार समिती सभापती सुनील शेळके, नगरसेवक भरत शेळके, शिवाजीराव शेळके, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, सागर शेळके, बंटी खरात, संदीप शेळके, गणेश शेळके, असगर इनामदार, उपअभियंता वाय. एस. काटकर, उपअभियंता शिवाजी रेड्डी, जितेंद्र शिंदे व कांचन भोईटे, मंडलाधिकारी रुपाली यादव, तलाठी शशिकांत वणवे आदी उपस्थित होते.
जितेंद्र डुडी म्हणाले, वारकरी व भाविकांची सुरक्षा, वाहतूक व अन्य सर्व बाबींच्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे. लोणंद मुक्कामी स्थानिक प्रशासन, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम, वीजपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी प्रशासन, आरोग्य व पाणीपुरवठा विभाग यांच्यावतीने सर्व तयारी झाली आहे. वारकरी व भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. स्थानिक प्रशासनाने वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवून उत्तम नियोजन केले आहे. सर्व ठिकाणचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वारकरी व भाविकांची अडचण होणार नाही. पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सुविधा कोठे उपलब्ध आहेत याची माहिती देणारे फलक तसेच डीजिटल स्क्रीन सर्व ठिकाणी लावण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील सर्व हॉटेल व मंगल कार्यालयातील शौचालये वारकऱ्यांसाठी खुली ठेवण्याचे आदेश द्यावेत. प्रत्येक गावात शौचालय बांधण्यासाठी जागा निश्चित करावी, अशा सूचना डुडी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डुडी यांनी लोणंद, नीरा स्नान, तरडगाव, फलटण या ठिकाणच्या पालखीतळांची पाहणी केली.
दत्तघाटाची पाहणी न केल्याने नाराजी
लोणंद येथील पालखी तळाला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून माउलींच्या नीरा स्नानाचे ठिकाण असलेल्या दत्तघाटाला भेट देणे अपेक्षित होते. त्यासाठी पाडेगाव ग्रामस्थ तसेच काही स्थानिक पदाधिकारी दत्तघाट येथे थांबले होते. मात्र, जिल्ह्यात येणाच्या पुलावरूनच त्यांनी लांबवर असलेल्या दत्तघाटाकडे पाहून यु टर्न घेत तरडगावकडे प्रस्थान केल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.





