Bihar Opinion Poll: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मॅट्रिझ-आयएएनएस संस्थेने केलेल्या मतदार मतांचा (ओपिनियन पोल) अहवालानुसार, महागठबंधनला मोठा धक्का बसत असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बाजू हळूहळू मजबूत होताना दिसत आहे. या सर्वेनुसार, जनता दल (युनायटेड) च्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, तर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या कामकाजाला जनतेची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, मॅट्रिझ-आयएएनएसने केलेल्या या सर्वेनुसार, एनडीएला १५० ते १६० जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महागठबंधनला ७० ते ८० जागा आणि इतर पक्षांना ९ ते १२ जागा मिळू शकतात. मतदानाच्या टक्केवारीनुसार, एनडीएला ४९ टक्के, महागठबंधनला ३६ टक्के आणि इतरांना १५ टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे. एनडीए आणि महागठबंधनातील पक्षांना किती जागा? सर्वे अंदाज – एनडीएमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. सर्वेनुसार, भाजपला ८० ते ८५ जागा, जनता दल (युनायटेड) ला ६० ते ६५ जागा, हिंदुस्थान अवामी मोर्चा (हम) ला ३ ते ६ जागा, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ला ४ ते ६ जागा आणि राष्ट्रीय लोकदल (आरएलएम) ला १ ते २ जागा मिळण्याची शक्यता आहे. महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) ला ६० ते ६५ जागा, काँग्रेसला ७ ते १० जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) ला ६ ते ९ जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ला ० ते १ जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) ला ० ते १ जागा आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) ला २ ते ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. यानुसार, बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ६ नोव्हेंबरला १२१ जागांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला १२२ जागांसाठी मतदान होईल. मतमोजणी १४ नोव्हेंबरला पार पडेल. बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत. ज्ञानेश कुमार यांनी सांगितले, की पहिल्या टप्प्यासाठी १० ऑक्टोबरला अधिसूचना जारी होईल, नामांकनाची अंतिम मुदत १७ ऑक्टोबर असेल, १८ ऑक्टोबरला नामांकन तपासणी होईल आणि २० ऑक्टोबरपर्यंत नावे माघार घेता येतील. दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना १३ ऑक्टोबरला जारी होईल, नामांकनाची अंतिम मुदत २० ऑक्टोबर असेल, २१ ऑक्टोबरला तपासणी होईल आणि २३ ऑक्टोबरपर्यंत नामे माघार घेता येतील. सर्वे नोंद: मॅट्रिझ-आयएएनएसने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी हा ओपिनियन पोल केला आहे. हा अहवाल बिहारमधील लोकांशी संवाद साधून तयार करण्यात आला असून, एकूण २४३ जागांसाठी ४६,८६२ नागरिकांशी चर्चा करण्यात आली. सर्वे १८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत पार पडला. अहवालातील चुकीच्या अंदाजाची त्रुटी (मार्जिन ऑफ एरर) ±३ टक्के आहे.