- टोळी गजाआड : गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई
पिंपरी – व्हॉट्स अप वर ग्रुप तयार करून त्याद्वारे मटक्याची बुकींग घेणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 65 हजारांचा ऐवज हस्तगत केला. ही घटना भोसरी येथे घडली.
इंद्रजीत जनार्दन भोईर (वय 32, रा. सावंतनगर, आळंदी रोड, पुणे), पवन चुडामन ठोकर, (वय 40, रा. बौध्दनगर,पिंपरी), स्वप्नील रामेश्वर कदम (वय 21, रा. काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांच्या आणखी तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गणेश पाटील कर्मचारी गणेश सावंत, नितीन खेसे, विशाल भोईर भोसरी परिसरात गस्त घालत होते. पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, शांतीनगर, भोसरी येथील हॉटेल मयूरेशचे मालक इंद्रजीत भोईर हा त्याचे व्हॉट्स अपच्या माध्यमातून मटका घेत आहे. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने हॉटेल मयूरेश येथे छापा टाकला. उर्वरित दोन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली.
आरोपींचे मोबाइल चेक केले असता तीन आरोपी आपआपल्या मोबाइलवर “व्हॉट्स अप ‘ ग्रुप तयार करून त्यावर ओळखिचे लोकांकडून मटका जुगार घेत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तीन आरोपींकडून 33 हजार 500 रुपये रोख रक्कम, तीन मोबाइल व हिशोबाच्या वह्या असा 65 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.