मथुरेत हेमा मालिनी विजयाची पुनरावृत्ती करणार?

– अमित शुक्‍ल 

उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघातील निवडणुका यंदा अत्यंत रंजक आणि रोचक होणार आहेत. मागील निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भरभक्‍कम मतांनी विजय मिळवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासाठी यंदाची निवडणूक तितकीशी सोपी नाही. त्यांच्या विरोधात महागठबंधनतर्फे राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार मोठे आव्हान उभे करण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे कॉंग्रेसनेही ब्राह्मण उमेदवार देऊन ही लढत अधिक चुरशीची बनवली आहे. राष्ट्रीय लोकदलाने पहिल्यांदाच एका ठाकूर उमेदवाराला मैदानात उतरवले आहे.

यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या खासदार हेमामालिनी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याचे कारण त्यांनी यापुढे निवडणुका लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांची ही अखेरची निवडणूक असणार आहे. दुसरीकडे ही निवडणूक राष्ट्रीय लोकदलासाठीही अस्तित्त्वाची ठरणारी आहे. तसेच महागठबंधनचे उमेदवार नरेंद्र सिंह यांच्या राजकीय जीवनाची दिशा ठरवणारीही आहे. कारण ते आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणुका हारले आहेत.

यंदा तिन्ही प्रमुख पक्षांनी वेगवेगळ्या जातीच्या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. यामध्ये कॉंग्रेसचे उमेदवार महेश पाठक यांच्यापुढेही आव्हानांचा डोंगर आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाठक यांचा पराभव झाला होता. तशातच मथुरा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता आजवर येथून कधीही ब्राह्मण उमेदवार विजयी झालेला नाही. यंदा हा इतिहास बदलतो की त्याची पुनरावृत्ती होते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

मतदारसंघाची रचना
मथुरा लोकसभा मतदारसंघात मथुरा, छाता, गोवर्धन, बलदेव, मांट हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात एकूण 17,86,187 मतदार असून यामध्ये 9,70,318 पुरुष, तर 8,15,660 महिला मतदार आहेत. मथुरा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार ओबीसी आहेत. मात्र ते वेगवेगळ्या जातींमध्ये विखुरलेले असल्यामुळे कोणत्याही पक्षाने तेथे ओबीसी उमेदवार उभा केलेला नाही. ओबीसींमध्ये सैनी, गुर्जर आणि बघेल या तीन प्रमुख जाती आहेत. अन्य जातींचा विचार करता जाट मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये जाट मतदारांचा मोठा हिस्सा भाजपाच्या उमेदवार हेमामालिनी यांच्या वाट्याला आला होता. ओबीसी आणि जाटांनंतर इथे तिसऱ्या स्थानावर ब्राह्मण समाजाची लोकसंख्या आहे. मात्र तरीही इथून ब्राह्मण उमेदवार विजयी झालेला नाही.

मागील निवडणुकांवर दृष्टिक्षेप
2009 मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार जयंत चौधरी हे 3,79,870 म्हणजेच 52.29 टक्‍के मते मिळवून विजयी झाले होते. या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या श्‍यामसुंदर शर्मा या बसपा उमेदवाराला 2,10,257 म्हणजेच 28.94 टक्‍के मते मिळाली होती. 2014 मध्ये भाजपाच्या उमेदवार हेमामालिनी यांनी 5,74,633 म्हणजेच तब्बल 53.29 टक्‍के मते मिळवत विजय नोंदवला. त्या निवडणुकीत जयंत चौधरी यांना 2,43,890 म्हणजेच 22.62 टक्‍के मते मिळाली होती. गतवेळच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण मतदारसंघात हेमामालिनींची जादू पसरली होती. विरोधक तेथे नसल्यासारखे होते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. कारण गेल्या 5 वर्षांत हेमामालिनींचा जनसंपर्क जराही राहिलेला नाही.

मतदारसंघातील लोकांच्या सुखदुःखाची चौकशी करण्यासाठी त्या गेल्याचे कधीच पाहायला मिळाले नाही. तशातच त्यांना पक्षांतर्गत आव्हानही निर्माण झाले आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी हेमामालिनींच्या प्रचारापासून स्वतःला दूर ठेवण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी हेमामालिनी यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांच्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत. प्रामाणिक नेता म्हणून त्यांची छबी तयार झाली आहे. कोणाही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची बदली करण्यासाठी वशिलेबाजी केलेली नाही. या गोष्टी आणि वर्षानुवर्षांपासूनचा त्यांचा चाहता वर्ग त्यांच्यासाठी अनुकूल ठरू शकतात.

दुसरीकडे आघाडीचे उमेदवार नरेंद्र सिंह यांच्यापुढे जाट मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याचे आव्हान आहे. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे नरेंद्र सिंहांचे भाऊ आणि तीन वेळा खासदार राहिलेले मानवेंद्र सिंह हे भाजपामध्ये सामील झाले आहेत. मानवेंद्रांनी आजवर पाच निवडणुका लढवल्या आहेत आणि या निवडणुकांत नरेंद्रसिंह सदैव त्यांच्यासोबत राहिले आहेत. पण यंदा मानवेंद्र नरेंद्रांसोबत नाहीत. असे असले तरी नरेंद्र सिंह हे संघर्षशील नेते म्हणून ओळखले जातात. लोकांशी थेट संपर्क असणारा नेता म्हणूून त्यांची ओळख आहे. तसेच सक्रिय राजकारणात असूनही सर्वांशी मधुर संबंध असणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. या गोष्टी त्यांच्यासाठी जमेच्या ठरणाऱ्या आहेत.

18 एप्रिल रोजी या मतदारसंघात मतदान होणार आहे. पाहूया बॉलीवूडच्या ड्रीमगर्ल विजयाची पुनरावृत्ती करतात की नरेंद्र सिंह आणि महेश पाठक यांच्यापैकी कोणाच्या पारड्यात मतदार भरघोस मते देतात ते !

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.