प्रभात वृत्तसेवा माथेरान – आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीने प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीचीच आघाडी शहरात स्पष्टपणे दिसत आहे. घरोगरी भेटी, सोशल मीडिया मोहीमा, लहान-मोठ्या बैठका आणि संघटनात्मक जाळ्याचा प्रभावी वापर करत युती मतदारांपर्यंत वेगाने पोहोचत आहे.या निवडणुकीत १० पुरुष आणि १० महिला असे २० नगरसेवक उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार, असे एकूण २१ उमेदवारांचे पथक युतीकडून रिंगणात उतरले आहे. नवीन चेहऱ्यांना दिलेली संधी हा युतीचा प्रमुख मुद्दा ठरत असून मतदारांमध्ये उमेदवारांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. युतीच्या प्रचाराची आखणी शिवसेना शिंदे गटाचे निरीक्षक आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. त्यांच्या पुढाकाराने उमेदवारांसाठी विशेष अभ्यासवर्ग आयोजित केले जात असून प्रचारातील मुद्दे, जनसंपर्काची पद्धत, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे प्रशिक्षण देखील कार्यकर्त्यांना दिले जात आहे. अधिकृत प्रचाराची संपूर्ण रणनिती अद्याप समोर आली नसली, तरी निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली युतीची प्रचारयंत्रणा दिवसेंदिवस चांगलाच वेग घेत आहे. शहरातील शिवसेनेचे शहरप्रमुख मनोज खेडकर आणि भाजपा शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ हे दोन्ही नेते एकत्रितपणे राबविलेल्या प्रचार मोहिमेत सक्रिय आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली युती मतदारांपर्यंत ठोस संदेश पोहोचवत असून प्रत्येक प्रभागात संघटना जोरदार उपस्थिती दाखवत आहे. संघटनेची शिस्त, नेतृत्वाची दिशा आणि उमेदवारांची सक्रियता यामुळे माथेरानमधील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांत प्रचार आणखी वेग घेईल आणि निवडणुकीचे राजकारण अधिक तापेल, अशी शक्यता मतदारांकडून व्यक्त केली जात आहे.