मॅच फिक्सिंग फौजदारी गुन्हा ठरावा

लाहोर – मॅच फिक्सिंग, सट्टेबाजी व बुकींशी संबंध हा फौजदारी गुन्हा ठरावा व त्यासाठी दोषी असल्याचे सिद्ध झालेल्या खेळाडूंना तुरुंगात टाकले जावे तसेच कठोर शिक्षा व्हावी तरच या प्रकारांना आळा बसेल, असे मत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे.
मॅच फिक्सिंगचे प्रकरण 1999-2000 साली सर्वप्रथम उघडकीला आले होते. त्यावेळी अनेक खेळाडू गोत्यात आले होते. तसेच अनेकांवर कारवाई देखील झाली होती. त्यानंतर अनेकदा या घटना घडल्याचेही समोर आले होते.
मात्र, याबाबत आरोपच केले गेले होते हाती काहीच लागले नव्हते. मात्र, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत पाकिस्तानचे महंमद अमीर व महंमद युसुफ स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर अजूनही हे प्रकार थांबलेले नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी इंग्लंडमध्ये झालेल्या एका स्पर्धेत व पाकिस्तानमधील सुपरलिगमध्ये उमर अकमलने फिक्सिंग केल्याचे व अन्य खेळाडूंना तसा प्रस्ताव दिल्याचे समोर आले. त्याच्यावर कारवाई देखील झाली. मात्र, तरीही पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी ही कारवाई पुरेशी नसल्याचे मत व्यक्त करत या खेळाडूंवर फौजदारी कारवाईची मागणी केली. भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या खेळाडूवर देशाच्या कायद्यानुसार फौजदारी कारवाई व्हावी व त्याला तुरुंगात टाकले जावे, असे मत पाकिस्तानचे माजी कसोटीपटू रमीज राजा व जावेद मियांदाद यांनी व्यक्त केले आहे.
5 वर्षांपूर्वी जेव्हा न्यूझीलंड क्रिकेटमध्ये हा प्रकार घडला त्यानंतर माजी कसोटीपटू ख्रिस क्रेन्स याच्यावर आरोप झाले मात्र, ते सिद्ध होऊ शकले नाहीत म्हणून त्याला क्लिन चीट देण्यात आली. यातून बोध घेत त्यांच्या क्रिकेट मंडळाने देशाच्या सरकारकडे पाठपुरावा करून मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग, सट्टेबाजी व बुकींशी संबंध तसेच याबाबतचे सर्व गैरवर्तन कायद्याच्या कक्षेत आणून दोषींवर गुन्हा नोंदला जावा व त्यांना फौजदारी खटल्यातील तरतुदीनुसार शिक्षा व्हावी यासाठी देशाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली. सरकारने देखील ही मागणी मान्य करून आवश्यक ते सर्व बदल केले. त्यानंतर आजपर्यंत तिथे हा प्रकार घडला नाही. असाच अंकुश पाकिस्तानातही लावला जावा अशी मागणी सुरू झाली आहे.
सज्जनांचा हा खेळ सज्जनांचाच राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच प्रसंगी कायदा इतका कठोर व्हावा की अशा खेळाडूंची संपत्ती जप्त केली जावी, त्यांची कामगिरी रद्द ठरवली जावी, अशी अपेक्षाही राजा व मियांदाद यांनी व्यक्त केली आहे.
म्हणून गुन्हेगार मोकाट सुटतात….
1999-2000 साली जेव्हा मॅच फिक्सिंगचे प्रकरण उघड झाले व त्यातील दोषींवर कारवाई झाली त्यातून खेळाडूंनी कायदेतज्ज्ञांच्या मदतीने पळवाटा काढल्याचेही स्पष्ट झाले आहे. यातून मंडळाच्या अचारसंहितेच्या, मंडळाच्या घटनेतील कलमांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. तसे भविष्यात घडू नये व दोषी खेळाडूंवर अत्यंत कठोर कारवाई केली जावी यासाठी प्रसंगी नवे नियम तयार करून, देशाच्या कायद्यानुसार भ्रष्टाचाराला ज्या कठोर शिक्षेची तरतूद आहे ती शिक्षा अशा खेळाडूंना देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.





