मांजरी, दि. 28 – “वर्षानुवर्षे हलाखीची परिस्थिती, जीवनमान उंचावण्यासाठी करावा लागणारा संघर्ष त्यासाठी आता रडत न बसता सर्व समाज बांधवांनी एकजुटीने लढण्याची गरज आहे. आपल्या एका मताची किंमत दाखवण्याची वेळ आली आहे,’ असे मत माजी गृहराज्यमंत्री मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व जयंतीनिमित्त मांजरी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, सुरेश घुले, दिलीप घुले, विठ्ठल थोरात, शाम पाटोळे, नितीन जाधव, सदानंद आरण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मातंग एकता आंदोलन मांजरी बुद्रुक शाखा अध्यक्ष शाम पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण रणदिवे यांनी सूत्रसंचालन, तर आभार उमेश लोंढे यांनी मानले.