मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जागवल्या वडिलांच्या आठवणी

वडीलांच्या संस्कारांचा यशात मोठा वाटा
मुंबई – आपल्या वडीलांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या, विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने आपल्या वडीलांची आठवण जागवणारी पोस्ट रविवारी सोशल मिडीयामध्ये चर्चेचा विषय ठरली. या पोस्टमध्ये भारतरत्न विजेत्या सचिन तेंडुलकरने प्रा. रमेश तेंडुलकर यांच्यासमवेतचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यामध्ये अर्थातच लेखक असलेले प्रा. रमेश तेंडुलकर सचिनला एक पुस्तक दाखवताना दिसत आहेत.
सचिनने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे वडील प्रेमळ होते, (ते) कडक नव्हते. (त्यांना) घाबरण्याऐवजी, त्यांनी ज्या प्रेमाने आम्हाला वाढवले, ते अनमोल होते. त्यांनी मला खूप काही शिकवले आणि जे जग माझ्यासाठी अभिप्रेत आहे, ते मिळण्यासाठी ते सदैव आग्रही राहिले. त्यांची विचारसरणी, संस्कार आणि पालकत्वाची कल्पना त्याच्या काळाच्या खूप पुढे होती. आज तुम्ही हवे होतात, बाबा.
सचिन तेंडुलकरचे वडील रमेश हे मराठीचे प्राध्यापक होते. मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात ते मराठीचे अध्यापन करत असत. त्यांनी कवितालेखनही (“मानस लहरी’ आणि “प्राजक्त’) केले होते. तसेच, मराठीतील बालकवी अर्थात त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांच्या कवितेचा वेध घेताना त्यांनी केशवसुत, गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी आणि बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितांची त्यांनी केलेली समीक्षा आजही लक्षणीय मानली जाते. ते एक उत्तम अनुवादकही होते.
सचिनच्या पराक्रमाचे प्रा. रमेश यांना अपार कौतुक असायचे. वर्ष 1999 मध्ये विश्वचषकाच्या लढती सुरु असताना सचिनच्या वडिलांचे मुंबईत निधन झाले होते. त्यावेळी अंतिम संस्कार करुन सचिनने तिसऱ्याच दिवशी केनियाविरुद्ध शतक झळकावले होते, जे त्याने आपल्या वडिलांना अर्पण केले होते. आपले 50 वे कसोटी शतकही सचिनने वडिलांनाच अर्पण केले होते.
सचिन सांगतो की, माझ्या वडिलांकडून मला शिकायला मिळालेला सर्वात मोठा धडा म्हणजे ते सर्वांशी समानतेने वागायचे, मग ते आमच्या घरी आलेले मोठे नावाजलेले लेखक असोत किंवा सफाई कामगार असोत. माझ्यासाठी ती सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. ते सांगायचे, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या असतात आणि प्रत्येक गोष्टीला एक कालमर्यादा असते. पण एकच गोष्ट जी कायम राहते ती म्हणजे तुमचा स्वभाव, कारण तो तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहतो. त्यामुळे तुम्ही नेहमी योग्य रीतीनेच वागले पाहिजे. मी फक्त त्या सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रा. रमेश यांच्या द्वितीय पत्नी रजनी यांचा सचिन हा मुलगा. त्याला नितीन नावाचा एक भाऊही आहे. आपल्या वडिलांच्या प्रेरणेमुळेच आपण क्रिकेटमध्ये जरा तरी उल्लेखनीय काही करु शकलो, असे सचिनने अनेकदा बोलून दाखवले आहे.





