Sachin Tendulkar : ‘मास्टर ब्लास्टर’ची मोठी खरेदी; जमीनीसाठी मोजले तब्बल ‘इतके’ कोटी, ड्रीम होम बांधणार असल्याची चर्चा
Sachin Tendulkar : ही जमीन तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये आहे. त्यापैकी ३.०९ एकर जमिनीसाठी ६३.६९ कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. दुसऱ्या जमिनीच्या तुकड्याची खरेदी ४.५६ कोटी रुपये, तर तिसऱ्या तुकड्याची खरेदी १.७५ कोटी रुपयांना झाल्याचे वृत्त आहे.

Sachin Tendulkar : महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या लोणावळ्यात प्रॉपर्टी गुंतवणुकीचा ट्रेंड वाढत आहे. अनेक सेलिब्रिटींसाठीही हे ठिकाण गुंतवणुकीचे आवडते ठिकाण मानले जाते. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही लोणावळ्यात मोठी जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
Zapkey च्या वृत्तानुसार, सचिनने लोणावळ्यात जवळपास ३.८६ एकर जमीन खरेदी केली आहे. या व्यवहारासाठी त्याने तब्बल ७० कोटी रुपये मोजल्याचे सांगितले जात आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या व्यवहारासाठी ४.२० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ९० हजार रुपये नोंदणी शुल्क भरल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थंड हवेच्या ठिकाणी आलिशान घर बांधण्याच्या उद्देशाने सचिनने ही जमीन खरेदी केली आहे. ही जमीन तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये आहे. त्यापैकी ३.०९ एकर जमिनीसाठी ६३.६९ कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. दुसऱ्या जमिनीच्या तुकड्याची खरेदी ४.५६ कोटी रुपये, तर तिसऱ्या तुकड्याची खरेदी १.७५ कोटी रुपयांना झाल्याचे वृत्त आहे.
यातील ३.०९ एकर जमीन सचिनच्या पूर्ण मालकीची असल्याचे सांगितले जात आहे. तर उर्वरित दोन जमिनींमध्ये त्याची ५० टक्के भागीदारी आहे. हे तिन्ही व्यवहार नंदन मेहता आणि विवस्वत मेहता यांच्याकडून झाल्याची माहिती आहे. मात्र, या व्यवहाराबाबत सचिन तेंडुलकर किंवा मूळ जमीन मालकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
लोणावळ्यातील गुंतवणुकीला वाढती पसंती
पुण्यापासून सुमारे ६४ किलोमीटर अंतरावर असलेले लोणावळा हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. मान्सून आणि हिवाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, वर्षभर पर्यटकांचा राबता असल्याने या भागातील प्रॉपर्टी गुंतवणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
वांद्र्यात सचिनचा आलिशान बंगला
सचिन तेंडुलकरचा मुंबईतील वांद्रे परिसरात आलिशान बंगला आहे. २००७ साली त्याने ही प्रॉपर्टी ३९ कोटी रुपयांना खरेदी केली होती. जवळपास ६ हजार चौरस फुटांच्या या घरात अनेक मजले आणि दोन बेसमेंट असल्याचे सांगितले जाते.
बेसमेंटमध्ये सुमारे ५० कार पार्क करण्याची व्यवस्था असल्याची माहिती आहे. घरातील लक्झरी सुविधांमुळे सचिनचा हा बंगला नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या बंगल्याची किंमत १०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो.






