मुंबई : नवी मुंबईतील वाशी सेक्टर १४ येथील एमजीएम कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सी इमारतीत दिवाळीच्या रात्री साडेदहा वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक तपासात ही आग दिवाळी रोषणाईतील शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आले असून, सुसाट वाऱ्यामुळे आग दहाव्या मजल्यापासून ११ व्या आणि १२ व्या मजल्यापर्यंत पसरली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सहा वर्षांची चिमुकलीसह एका कुटुंबीयांचा समावेश आहे. सुमारे दहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्ध महिला दमयंती अग्रवाल यांचा आगीत मृत्यू झाला. तर १२ व्या मजल्यावर राहणारे ४० वर्षीय पूजा राजन, त्यांचे पती ४५ वर्षीय सुंदर पालक कृष्णन आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी वेदिका हिचा गुदमरून मृत्यू झाला. याशिवाय एक दांपत्यही या घटनेत गतप्राण झाले. अकराव्या मजल्यावरील काही कुटुंबीय वेळीच इमारतीबाहेर पळाले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. आग तीन तासांहून अधिक काळ धगधगत होती. वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे अग्निशमन केंद्रांतील शेकडो अग्निशमन दलाचे जवान आणि वाहने घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक अहवालात इमारतीत व्हेंटिलेशनच्या अभावामुळे धुराचे प्रमाण वाढून गुदमरून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे नवी मुंबईतील सर्व उंच इमारतींच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेच्या तपासणीसाठी आयुक्तांनी तात्काळ निर्देश दिले आहेत. व्हेंटिलेशन, अग्निशमन उपकरणे आणि इमारतींच्या सुरक्षा ऑडिटची कडक तपासणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिस आणि अग्निशमन दलाकडून सखोल तपास सुरू असून, शॉर्ट सर्किटचे नेमके कारण शोधण्यात येत आहे. ही घटना दिवाळीच्या तोंडावर घडल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.