Kalyan News : कल्याणमधील व्हर्टेक्स सोसायटीमध्ये फ्लॅटला भीषण आग

कल्याण : कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधारवाडी परिसरात असलेल्या नामांकित व्हर्टेक्स हाऊसिंग सोसायटीमध्ये एका फ्लॅटला आग लागली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. मात्र आगीमध्ये फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
काय घडले नेमके?
कल्याणमधील आधारवाडी परिसरात उच्चभू व्हर्टेक्स हाऊसिंग सोसायटीमध्ये संध्याकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडली. इमारतीच्या १४ व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटला आग लागली. आग लागल्यानंतर वेळीच घरातील सदस्य घरातून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या आगीमध्ये हा संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला.
तातडीने घटनेची माहिती कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.





