मुंबई : दहिसर येथील न्यू जनकल्याण सोसायटीत रविवारी दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत १९ जण जखमी झाले असून त्यातील एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला. यातील अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शांती नगरातील २३ मजली न्यू जनकल्याण सोसायटीच्या सातव्या मजल्यावर अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच रहिवाशांनी आरडाओरडा करून इमारतीबाहेर पळ काढला. मात्र, अनेक रहिवासी इमारतीतच अडकले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, आगीची तीव्रता सातत्याने वाढत होती. दरम्यान, या इमारतीतील ३६ रहिवासी आगीच्या विळख्यात सापडले होते. अग्निशामकांनी संबंधित रहिवाशांची सुटका केली. मात्र, त्यातील १९ जण जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दोन जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.