प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे एका कंपनीतील स्क्रॅपच्या गोडाऊनला बुधवारी (दि. २६) चारच्या सुमारास आग लागली. या भीषण आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.डीबीएस पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील स्क्रॅपच्या गोडाऊनमध्ये आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने धुराचे लोळ लांबपर्यंत दिसू लागले. आग लागल्याची माहिती मिळताच पुणे महानगर विकास प्राधिकरणचे एक आणि अर्सेलोर मित्तल निपोन स्टील इंडिया कंपनीचे एक, अशी दोन अग्निशामक दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. या पथकांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण आणले. मात्र, आगीमध्ये कंपनीच्या स्क्रॅप मालासह एक यंत्र, इलेक्ट्रिक साहित्य आणि कंपनीच्या शेडचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आठवड्याभरापूर्वी ‘दैनिक प्राभत’ने या संबंधाने एक बातमी प्रकशित केली होती की, शिक्रापूर किंवा सणसवाडी परिसरात एक अग्निशामक केंद्र उभारणे अत्यंत आवश्यक आहे. या परिसरात आग लागल्यानंतर पुण्यातून अग्निशमक बम्ब पोहोचेपर्यंत आग आटोक्याच्या बाहेर जाते. तेच जर या परिसरात एक अग्निशामक केंद्र असेल तर अशा घटनांवर नियंत्रण मिळवणे व नुकसान टाळता येणे सुलभ होईल.या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. कंपनीत फायर अलार्म वाजल्यामुळे महिलांसह सत्तर ते ऐंशी कामगार तातडीने मोकळ्या जागी गोळा झाल्याने दुर्घटना टळली.