Furniture Market Fire : ओशिवारातील फर्निचर मार्केटला भीषण आग; 10 ते 12 दुकाने जळून खाक

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील ओशिवारा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे. गोदामातील लाकडी वस्तूंमुळे ही आग भडकली असून आसपासची दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. 10 ते 12 दुकांना आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मंगळवारी दुपारच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ओशिवरा येथील हे फर्निचर मार्केट लाकडी आणि शोभेच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी शेकडो लाकडी वस्तूंची दुकाने आहेत. त्यामुळे आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल झाल्या असून मुंबई पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीच्या घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.





