पुणे : शहरातील सदाशिव पेठेतील १२९१ क्रमांकाच्या चव्हाण वाडा येथे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. वाडा हा एक मजली असून, त्यात चार कुटुंबे वास्तव्यास होती. छतावरून धूर व ज्वाळा उठताना दिसताच रहिवाशांनी तत्काळ बाहेर पडून अग्निशमन दलाला पाचारण केले. जवानांनी घटनास्थळी पोहोचताच प्रथम कोण अडकले आहे का हे तपासले. त्यानंतर तीन गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आग आणि धूर मोठ्या प्रमाणात असल्याने जवानांनी सुमारे वीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली व कुलिंगचे काम सुरू ठेवले. वेळेत कारवाई झाल्याने आग शेजारील भागात पसरण्यापासून रोखण्यात यश आले. या घटनेत वाड्यातील सर्व घरगुती साहित्य जळून खाक झाले असले तरी कोणतीही जखमी वा जीवितहानी झालेली नाही. वाड्याखाली असणाऱ्या दुकानदारांनी तत्परतेने आपला माल बाहेर काढल्याने मोठे नुकसान टळले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.