खालापूर : कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील मंगलम ऑर्गॅनिक्स कंपनीच्या जुन्या प्लांटमध्ये बुधवारी (दि. १६ जुलै) रात्री ११.३० वाजता भीषण आग लागली. कापूर उत्पादन करणाऱ्या या कंपनीत फिल्टरजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने आगीची ठिणगी उडाली आणि काही क्षणांतच संपूर्ण प्लांटने पेट घेतला. अति ज्वलनशील पदार्थाचे उत्पादन करत असतानाही कंपनीची अग्निशामक यंत्रणा सुरळीत चालत नसल्याचेही यावेळी दिसून आले. प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात कापूर आणि इतर ज्वलनशील पदार्थ साठवलेले असल्याने आगीचे रूप भयावह झाले. मात्र, कंपनीतील फायर गाडी नादुरुस्त असल्यामुळे आग तात्काळ विझवता आली नाही. यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आणि काही वेळ परिसरात पूर्णपणे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कामगारांनी धावाधाव करून स्वतःचा जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, तसेच मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या मदतकार्यात हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवकही सहभागी झाले होते. दरम्यान या कंपनीत काही वर्षांपूर्वीही अशीच आग लागल्याची घटना घडलेली आहे. ज्वलनशील पदार्थ हाताळणाऱ्या कंपनीकडून सतत सुरक्षाविषयक नियमांची अपेक्षा केली जाते. मात्र, स्थानिक ग्रामस्थांच्या मते कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. या आगीमुळे कुंभिवलीसह परिसरातील लोकांना जीवित व मालमत्तेच्या धोक्याचा गंभीर फटका बसू शकला असता. त्यामुळे फॅक्टरी इन्स्पेक्टरमार्फत सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे. यंत्रणा नादुरुस्त सदर कंपनीत दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना आहे. कंपनीतील ज्वलनशील कापूर उत्पादनामुळे अग्निशमन सुविधा कायम व्यवस्िथत असणे अत्यावश्यक होते. मात्र व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे शेजारील कुंभिवली गावासह परिसरात मोठ्या संकटाची शक्यता निर्माण झाली होती.